उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,३५४ घरं लॉटरी पद्धतीने करण्यात आली - Thane 24 Taas

Saturday, October 11, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,३५४ घरं लॉटरी पद्धतीने करण्यात आली


ठाणे --  घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि आनंदाचा पाया आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचे काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने करत आहे,” असे प्रतिपादन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,३५४ घरं व ७७ भूखंडांच्या संगणकीय सोडतीचे उद्घाटन केले.म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे, ओरोस (सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या घरांची आणि भूखंडांची ही सोडत पारदर्शक संगणकीय पद्धतीने काढण्यात आली. या सोडतीसाठी तब्बल १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून, सरासरी एका घरासाठी ३५ ते ४० अर्ज मिळाले.“यावरून  म्हाडाच्या घरांच्या गुणवत्तेवर आणि किमतीवर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दिसून येतो,” 


असे शिंदे यांनी सांगितले.सोडत पूर्णपणे संगणकाद्वारे पार पाडली गेली असून, कोणताही मानवी हस्तक्षेप न होण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.“पूर्वी म्हाडाची स्थिती वेगळी होती, मात्र आता म्हाडाची घरे उत्कृष्ट दर्जाची, वेळेत पूर्ण होणारी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत. म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही, तर लाखो कुटुंबांच्या आनंदाचे कारण ठरली आहे,” असे शिंदे म्हणाले.आतापर्यंत ९ लाख घरे म्हाडामार्फत वितरित झाली असून आणखी ६० हजार व ४३ हजार घरांची आता भर पडली आहे .ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, डोंबिवली, उल्हासनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.“परवडणारी घरे, नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण आम्ही तयार केले आहे. तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी परवडणारी भाड्याची घरेही योजनेत समाविष्ट केली आहेत,” असे त्यांनी सांगितले.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरे बांधली जात आहेत.“मी मुख्यमंत्री असताना म्हाडा आणि एसआरएच्या रखडलेल्या प्रकल्पांवर महत्त्वाची बैठक घेतली. आता हे प्रकल्प सिडको, एमएमआरडीए, महापालिका यांच्या संयुक्त माध्यमातून पूर्ण केले जात आहेत,” 


असे शिंदे म्हणाले.रमाबाई आंबेडकर नगर येथे १७ हजार घरांचा प्रकल्प सुरू असून, तेथील रहिवाशांना १६० कोटी रुपये भाडे वितरित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार पुढील पाच वर्षांत ३० ते ३५ लाख नवीन घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या माध्यमातून खासगी व सरकारी क्षेत्रात मिळून सुमारे ५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असा अंदाज उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.“बाळासाहेब ठाकरे यांचे ‘प्रत्येकाला घर’ हे स्वप्न आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत,” असे शिंदे म्हणाले.“सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत सूचना केल्या असून, शासन यावर लवकरच निर्णय घेईल,” असे शिंदे यांनी सांगितले.नव्या जीएसटी धोरणामुळे घरांच्या किमती कमी झाल्या असून, त्यामुळे नागरिकांची खरेदीक्षमता वाढली आहे. “खरेदी वाढली की उत्पादन आणि रोजगार निर्मितीही वाढते,” असे त्यांनी नमूद केले.“क्लस्टर प्रकल्पांतर्गत मोठे रस्ते, बागा, वैद्यकीय सुविधा, क्रीडांगणे आणि जिम अशा आधुनिक सोयी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही योजना केवळ देशातच नव्हे, तर जगातही आदर्श ठरेल,” असे शिंदे म्हणाले.“म्हाडाने निर्माण केलेला विश्वास आणि गुणवत्ता कायम राखा,” असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.दरम्यान, सोडतीचा निकाल पाहण्यासाठी सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते.तसेच अर्जदारांना घरबसल्या निकाल पाहता यावा, यासाठी ‘वेबकास्टिंग’द्वारे थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.सोडतीच्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी रेवती गायकर आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment