ठाणे - राज्य सरकारने एकीकडे आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते हजारो कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप केला. विशेष म्हणजे, हा शिधा स्वीकारण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये सुमारे 500 हिंदी भाषिक नागरिक होते. या हिंदी भाषिकांनी पत्रकारांशी बोलताना मनसेच्या अविनाश जाधव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर मनोज प्रधान यांनी, मनसे सोबत असल्याने उत्तर भारतीय दूर जाणार नाहीत तर सोबतच येतील, असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी हे गेल्या दहा वर्षांपासून विविध सणांच्या निमित्ताने गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करीत असतात. शिवाय, दर महिन्याला सुमारे 100 कुटुंबांना वाणसामान देत असतात. यंदा दिवाळीनिमित्त पांचपाखाडी येथे त्यांनी सुमारे 2 हजार 500 कुटुंबांना रवा, साखर, मैदा, तेल, खोबरे आदी साहित्याचे वाटप केले. हेरिटेज मोटर्सच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राऊ पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उत्तर भारतीय रिक्षा चालक आणि महिलांना या कार्यक्रमातील मनसेच्या सहभागाबद्दल पत्रकारांनी विचारले असता, अविनाश जाधव हे सर्व हिंदी भाषींच्या विरोधात नाहीत. ते सर्वांनाच मदत करीत असतात. त्यामुळे आम्ही उत्तर भारतीय कधीच मनसेला विरोध करीत नाहीत, असे सांगितले. हाच धागा पकडून मनोज प्रधान म्हणाले की, ठामपाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत मनसेला घेतल्याने हिंदी भाषिक दुरावतील, असा अंदाज वर्तविणार्यांना ही चपराक आहे. या लोकांच्या प्रतिक्रियेतून हेच दिसून येते की मनसेच्या सहभागाने महाविकास आघाडीचा मतांचा टक्का वाढणारच आहे. तर, अविनाश जाधव यांनी, आपण एका उत्तर भारतीय व्यक्तीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आलो आहे, यातच सर्व काही आले आहे. इथे ज्या उत्तर भारतीयांनी आपले मत व्यक्त केले. ते व्यक्त करताना हिंदी न बोलता मराठी भाषेचा वापर केला. मराठीचा दुस्वास करणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि 95% उत्तर भारतीय हे मराठीचा आदर करणारे असून ते आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असे सांगितले.--- छाया, मनोज सिंह



No comments:
Post a Comment